लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकाला अटकबाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान वसंत बिले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मिरजेत रंगेहात पकडले. बिले याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिले याने तीन वर्षांपूर्वीच्या बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रमुख आरोपीला मदत केल्याबद्दल सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदाराला 25 हजारांची लाच मागितली होती.

याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. बुधवारी रात्री मिरजेत तक्रारदाराकडून 25 हजार रुपये लाच घेताना बिले याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस कर्मचार्‍यात खळबळ उडाली. याबाबत रात्री उशिरा मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस उपअधीक्षक संजय घाटगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान रात्री उशिरा बेले याच्या घरावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून घराची झडती घेतली.

Leave a Reply

Join our WhatsApp group